गॅस चोरी प्रकरणातील फरार आरोपीला ४ वर्षांनंतर गुजरातमधून अटक

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथे गॅस टँकरमधून गॅस चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मोठे यश आले आहे. गेल्या चार वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या या आरोपीला रत्नागिरी पोलिसांनी थेट गुजरात गाठून अटक केली आहे.

२०२२ मध्ये रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गॅस चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. करबुडे परिसरात गॅस टँकरमधून बेकायदेशीररित्या गॅस काढल्याप्रकरणी बुधाराम रामलाल (वय ४२) हा आरोपी पोलिसांना हवा होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता.

आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांचा आधार घेतला. तो गुजरातमध्ये असल्याची पक्की माहिती मिळाल्यानंतर, रत्नागिरी पोलिसांच्या पथकाने तिथे जाऊन सापळा रचला आणि गुरुवारी रात्री त्याला ताब्यात घेतले.

ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस बाळू जाधवर (सहायक पोलीस फौजदार), विनायक राजवैद्य (पोलीस हेडकॉन्स्टेबल), बाळू पालकर, रमीज शेख यांचा समावेश होता.
चार वर्षांनंतर फरार आरोपीला बेड्या ठोकल्यामुळे रत्नागिरी पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. आरोपीला आता पुढील न्यायालयीन प्रक्रियेसाठी रत्नागिरीत आणण्यात आले आहे.