दापोलीत जमिनीच्या वादातून वृद्धाला मारहाण

एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

दापोली:- जमीन आणि घर बांधण्याच्या वादातून एका ६२ वर्षीय वृद्धाला आणि त्यांच्या पत्नीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना दापोली तालुक्यातील वणौशी तर्फे नात देवळवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी दापोली पोलिसांनी एकाच कुटुंबातील चार जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियमांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दि. ३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी राजकुमार बाळाजी पाटणे (वय ६२) हे आपल्या पत्नीसह आरोपींच्या घरासमोरून जात होते. यावेळी आरोपी अंकुश दत्ताराम पाटणे याने वडिलोपार्जित जमिनीच्या वादाचा राग मनात धरून, “तू मला घर बांधायला विरोध करतोस काय?” असे म्हणत फिर्यादींना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
दगडाने मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी
हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी अंकुशने फिर्यादींना मारण्यासाठी घन उचलला आणि अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर जमिनीवर पडलेला दगड उचलून राजकुमार पाटणे यांच्या डाव्या गालावर जोरात मारला. दरम्यान, दुसरा आरोपी दिनेश पाटणे याने तिथे येऊन फिर्यादींच्या छातीवर बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी फिर्यादींच्या पत्नी त्यांना वाचवण्यासाठी आल्या असता, आरोपींनी त्यांनाही धक्काबुक्की करून दुखापत केली. “तुम्हाला आता जिवंत ठेवणार नाही,” अशी धमकी देत आरोपींनी त्यांचा अपमान केला.

​या प्रकरणी राजकुमार पाटणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दापोली पोलिसांनी अंकुश दत्ताराम पाटणे (वय ५०), दिनेश दत्ताराम पाटणे (वय ४४), सुनंदा दत्ताराम पाटणे (वय ७३), सुप्रिया अंकुश पाटणे (वय ४४) या आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १३१, ११८(१), ११५(२), ३५१(२) आणि ३५२ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.