अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
दापोली:- शहरातील जालगाव-नागरबुडी परिसरातील एक बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. अश्विनी प्रसाद दातार (वय ६०, सध्या रा. अंधेरी, मुंबई) यांचे दापोलीतील सोनचाफा, चैतन्यनगर येथे मूळ घर आहे. २४ मार्च ते २७ मार्च या कालावधीत त्यांचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे आणि सेफ्टी डोअरचे कुलूप कशाच्या तरी साहाय्याने तोडले. चोरट्यांनी घरात प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजाही उचकटला आणि घरातील साहित्याची उचकापाचक केली. सुदैवाने, या घटनेत चोरीचा केवळ प्रयत्न झाला असून मोठी वित्तहानी झाल्याचे प्राथमिक माहितीवरून दिसत नाही.
या संदर्भात अश्विनी दातार यांनी दिलेल्या तक्रारीवरून दापोली पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३३१(४) अंतर्गत गु.र.नं. ४८/२०२६ नुसार गुन्हा नोंदवला आहे. ३० मार्च रोजी रात्री १० वाजता हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.









