Monday, May 25, 2026
spot_img
Home गुन्हेगारी जमिनीच्या वादातून वृद्धावर कोयत्याने हल्ला

जमिनीच्या वादातून वृद्धावर कोयत्याने हल्ला

चिंचखरी येथील धक्कादायक घटना

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील चिंचखरी-मधलीवाडी येथे जमिनीच्या जुन्या वादातून एका ७७ वर्षीय वृद्धावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३० मार्च रोजी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास फिर्यादी आत्माराम बाळाराम बोरकर (वय ७७, रा. चिंचखरी) हे आपल्या घरासमोरील झाडांचा पडलेला पालापाचोळा झाडून गोळा करत होते. घरासमोरील आंब्याच्या झाडाखाली गोळा केलेला हा पालापाचोळा जाळत असताना, तिथे आरोपी संतोष बाबुराव सुर्वे आला.

जमीन व जागेच्या जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपी संतोष सुर्वे याने आत्माराम बोरकर यांच्याशी वाद घातला. त्याने हातातील कोयत्याच्या उलट्या बाजूने बोरकर यांच्या मानेवर आणि डाव्या मांडीवर प्रहार केला. तसेच, झटापटीत कोयत्याची धार लागल्याने बोरकर यांच्या डाव्या हाताच्या बोटाला गंभीर दुखापत झाली आहे.

या हल्ल्याप्रकरणी आत्माराम बोरकर यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपी संतोष सुर्वे याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ११८(१), ३५२ आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ३० मार्च रोजी रात्री १०:३७ वाजता हा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.