मिरकरवाडा चाकू हल्ला प्रकरणात ‘छोटा भाई’ याचा हात

रत्नागिरी: मिरकरवाडा येथे शिमगोत्सवातील वादातून मच्छीमारावर झालेल्या प्राणघातक हल्लाप्रकरणी तिघा संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मिऱ्या येथील ‘छोटा भाई’चा समावेश असल्याचे पुढे आले आहे. ७मार्चला सकाळी ही घटना घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रूपेश कमलाकर सावंत उर्फ छोटा भाई, शशांक रूपेश सावंत आणि संजू (पूर्ण नाव माहिती नाही) या तिघां संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांनी दुचाकी आडवी लावून जयेंद्र दत्ताराम नार्वेकर (वय ५५) यांच्यावर हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत.

जयेंद्र नार्वेकर हे दुचाकीने बोटीच्या कामासाठी मिरकरवाडा जेटीकडे जात होते. जेटीच्या पहिल्या गेटजवळ संशयितांनी दुचाकी आडवी लावून नार्वेकर यांना अडवले. भाट्ये-मिऱ्या येथील दत्तमंदिर परिसरात झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागातून संशयितांनी नार्वेकर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संशयित शशांक व संजू यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच वेळी रूपेश कमलाकर सावंत ऊर्फ ‘छोटा भाई’ तिथे आला. त्याने चाकूने जयेंद्र नार्वेकर यांच्यावर वार केले, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.