Friday, May 1, 2026
spot_img
Home रत्नागिरी जेलनाका येथे भरधाव कारने २ दुचाकींना उडवले; पाचजण जखमी

जेलनाका येथे भरधाव कारने २ दुचाकींना उडवले; पाचजण जखमी

बुधवारी रात्रीची घटना; चालका विरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरीः–  शहरातील वर्दळीच्या जेलरोड परिसरात बुधवारी रात्री भरधाव कारने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पाच जण जखमी झाले असून, त्यात एका महिलेचा आणि तिच्या दोन लहान मुलींचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिल सिंग विक्रमसिंग (वय २३) हे त्यांच्या टीव्हीएस रायडर दुचाकीवरून (क्रमांक RJ-44-SF9967) मित्र ओमप्रकाश मेघवाल याच्यासह आठवडा बाजार ते मारुती मंदिरकडे जात होते. बुधवारी रात्री ८.४५ च्या सुमारास जेलनाका परिसरात मागून येणाऱ्या एका कारने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, सिंग यांच्या दुचाकीसोबतच समोरून येणाऱ्या अन्य एका दुचाकीलाही कारने धडक दिली. या दुसऱ्या दुचाकीवरील बिल्कीस नदीम दलाल (वय ३५) आणि त्यांच्या दोन लहान मुली जखमी झाल्या.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत सर्व जखमींना रिक्षाने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी कार चालक सिद्धराज गजानन मयेकर (रा. शिरगाव) याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.