रत्नागिरी:- कोकणच्या शेतीचा आणि पावसाळ्याचा जिव्हाळ्याचा संबंध असलेल्या ‘मृग नक्षत्रा’ला सोमवार, 8 जूनपासून अधिकृत सुरुवात झाली आहे. पावसाचे वेध लागलेले असतानाच, मुंबई हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढील तीन दिवसांचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. मृगाच्या आगमनासोबतच वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱयांसह नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी 6 नंतर मृग नक्षत्राच्या मुहुर्तावर पावसाचे जोरदार आगमन झाले.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, सोमवारीही दिलेल्या इशाऱ्यानंतर मंगळवार 9 आणि बुधवार 10 जून या दोन दिवसांत जिल्ह्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह सोसाटय़ाचा वारा वाहू शकतो, त्यामुळे बाहेर पडताना नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. प्रशासनाने या कालावधीत सतर्कतेच्या सूचना जारी केल्या आहेत. विजा चमकत असताना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन केले आहे.
मृग नक्षत्राच्या पहिल्या तीन दिवसांच्या या वादळी इशाऱयानंतर 11 आणि 12 जून रोजी हवामानात सुधारणा होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. या दोन दिवसांसाठी हवामान विभागाने कोणताही इशारा दिलेला नाही. त्यामुळे 11 जूनपासून पावसाचा जोर ओसरून हवामान सामान्य होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाचे हे संकेत मिळाल्याने शेतीची कामे वेग घेणार आहेत. मात्र, विजांचा कडकडाट लक्षात घेता शेतकरी बांधवांनी शेतात काम करत असताना सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी असे प्रशासनाकडून सुचवण्यात आले आहे.
लांजा आणि राजापूरमध्ये पावसाया हलक्या ते दमदार सरी
रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनच्या सुरुवातीलाच पावसाने संथ गती घेतली असून, 7 जून रोजी दिवसभरात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्याचे दिसून आले. केवळ लांजा, राजापूर आणि चिपळूण या दक्षिण व मध्य रत्नागिरीच्या भागात काही ठिकाणी हलक्या ते दमदार सरी बरसल्या.
8 जून रोजी संपूर्ण जिह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या 24 तासांत सरासरी केवळ 13.03 मि.मी. इतक्याच अत्यंत नगण्य पावसाची नोंद झाली. उत्तर रत्नागिरीतील मंडणगड, दापोली, खेड आणि रत्नागिरी तालुक्यातही 7 जून रोजी पावसाने अनेक भागात हजेरी लावली. दरम्यान, 6 जूनचा कोरडा दिवस उलटल्यानंतर 7 जून रोजी मात्र जिह्याला पावसाने दमदार सलामी दिली. राजापूरमध्ये एकाच दिवशी 53.30 मि.मी. तर गुहागरमध्ये 17.30 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आता जिल्ह्यात मान्सून सक्रिय होत असल्याचे चित्र आहे. मात्र आगामी काळात या मान्सूनचा प्रवास कसा राहणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
8 जून रोजी सकाळपर्यंत झालेला तालुकानिहाय पाऊस (मि.मी. मध्ये):
मंडणगड- 2.00, दापोली-10.10, खेड- 2.30, गुहागर-17.30, चिपळूण-6.80, रत्नागिरी-8.30, लांजा-10.40, राजापूर-53.30. तर जिल्हय़ात एकूण 121.30 मिमी इतक्या पर्जन्यमानाची नोंद करण्यात आली आहे.









