Thursday, June 11, 2026
spot_img
Home चिपळूण कशेडी बोगद्याजवळ भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

कशेडी बोगद्याजवळ भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याजवळ सोमवारी, २ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४:४५ च्या सुमारास एक भीषण अपघात घडला. एका भरधाव स्विफ्ट कारवरील चालकाचा ताबा अचानक सुटल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात कारमधील दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या होत्या, त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच भरणी नाका ब्रिजखाली २४ तास सेवेत असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान (नाणिज धाम) यांची मोफत रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक सूरज हंबीर यांनी प्रसंगावधान राखत जखमींना प्राथमिक उपचार दिले आणि तातडीने कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

दुर्दैवाने, रुग्णालयात उपचार सुरू असताना डॉक्टरांनी एका जखमीला मृत घोषित केले. दुसऱ्या जखमीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र, स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक पूर्ववत केली.

कशेडी बोगदा परिसरात यापूर्वीही अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी या भागात वेगमार्यादा पाळावी आणि वाहन चालवताना विशेष खबरदारी घ्यावी,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.