संगमेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल
संगमेश्वर:- रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील उजगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किरकोळ वादातून पोटच्या मुलीला वडील आणि चुलत्यांनी लाकडी काठी आणि केरसुणीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत मुलीच्या तोंडाला आणि दाताला गंभीर दुखापत झाली असून, याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तृप्ती निवृत्ती पवार (वय २६, रा. उजगाव तेलीवाडी) या २२ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आपल्या घराच्या अंगणात चुलती स्वाती पवार यांच्याशी गप्पा मारत होत्या. यावेळी तिचे वडील संशयित निवृत्ती लक्ष्मण पवार (वय ५९) तिथे आले आणि “तुमच्यामुळे माझी मुलगी खूप शेफारते,” असे म्हणून वाद घालू लागले.
वाद वाढू नये म्हणून चुलत्यांनी आपल्या पत्नीला घरात पाठवून दिले. मात्र, त्यानंतर संतापलेल्या वडिलांनी अंगणातील लाकडी चिव्याची काठी घेऊन तृप्तीला संपूर्ण शरीरावर बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. याच वेळी तिथे उपस्थित असलेल्या दुसऱ्या संशयिताने, म्हणजेच चुलते शंकर लक्ष्मण पवार (वय ५५) यांनीही केरसुणीने मारहाण करण्यास सुरुवात केली.
या गंभीर मारहाणीमुळे तृप्ती यांच्या तोंडाला आणि ओठाला जबर मार लागला असून समोरील दातालाही दुखापत झाली आहे. घटनेनंतर घाबरलेल्या तृप्ती यांनी रात्र आपल्या चुलतीकडे काढली. दुसऱ्या दिवशी, २३ फेब्रुवारी रोजी त्यांनी देवरुख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली.
रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या एम.एल.सी. पत्राच्या आधारे पोलिसांनी तृप्ती यांचा जबाब नोंदवून घेतला. याप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी आरोपी वडील आणि चुलत्यावर भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.









