Monday, June 29, 2026
spot_img
Home गुन्हेगारी अवैध गुटखा विक्रीवर दापोली पोलिसांचा छापा

अवैध गुटखा विक्रीवर दापोली पोलिसांचा छापा

२४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

    दापोली:- शहरातील मंडणगड रस्त्यालगत आंबा पॉईंट परिसरात अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या टपरीवर दापोली पोलिसांनी रविवारी दुपारी सुमारे ४.१५ वाजता धाड टाकून २४ हजार २०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला. या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

    दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबा पॉईंट येथील काळ्या वडापाव विक्री केंद्रासमोरील एका टपरीत अवैध गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचांसह छापा टाकला. तपासणीदरम्यान टपरीमध्ये सहा पांढ्या रंगाच्या गोण्या आढळून आल्या.

    यापैकी पाच गोण्यांमध्ये ‘केसरयुक्त विमल पान मसाला’ या नावाची १,२१० पाऊच (एकूण ११० पुडे) आढळून आली. या मालाची किंमत २१ हजार ७८० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    तसेच एका गोणीत ‘व्ही-१’ सुगंधी तंबाखूचे १,२१० पाऊच (११० पुडे) आढळून आले असून त्याची किंमत २ हजार ४२० रुपये आहे. अशा प्रकारे एकूण २४ हजार २०० रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी कृष्णा नारायण गवळी (६०, रा. पांढरेवाडी, स्वामी व्हिला, दापोली) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७४, २७५, २२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या प्रकरणाचा पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत. दापोली पोलिसांनी केलेल्या या. धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, नागरिकांकडून पोलिसांच्या कारवाईचे स्वागत व कौतुक केले जात आहे.