अन्यथा तालुका बंद करू, स्थानिक ग्रामस्थ आक्रमक
रत्नागिरी:- संगमेश्वर साडवली येथील निवडणूक बॅनरवरून झालेल्या वादात देवरुख पोलिस निरिक्षक उदय झावरे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. झावरे यांची दोन दिवसांत बदली झाली नाही तर तालुका बंद व मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा उबाठाचे तालुकाप्रमुख बंड्या बोरुकर यांनी दिला आहे.याबाबत पोलिस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.
संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथे बॅनरवरून राजकीय पक्षांमध्ये वाद निर्माण झाला होता. साडवलीतील विजय धने, शुभम धने व दीपक डोंगरे यांनी विजयी उमेदवार शमा संतोष जाधव यांचा बॅनर फाडला व त्यांच्या वडिलांना धमकी दिली. यावेळी घटनास्थळी उबाठाचे कार्यकर्ते जमले होते. या प्रकरणातील शुभम धन व दीपक डोंगरे हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून यापूर्वी त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. असे असताना यापूर्वी त्यांना पोलिस निरिक्षक झावरे यांनी पाठीशी घातले व त्यांची बाजू घेतली, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
ज्या वेळी हा वाद झाला त्यावेळी घटनास्थळी नसलेल्या अनेक तरुणांवर सुडबुद्धीने झावरे यांनी गुन्हे दाखल केले आहे. सीसीटीव्ही फुटेज व साक्षिदारांवरून सिद्ध होऊ शकतो. झावरे यांनी भारतीय न्याय संहिता 2023 कलम 1998 नुसार लोकसेवक असूनही कायद्याच्या निर्देशाची जाणीवपूर्वक अवज्ञा केली आहे. तपासाच्या नियमांचे पालन न करता आणि कोणतीही शहानिशा न करता कायद्याच्या प्रक्रियेचा दुरुपयोग करून ही कारवाई केली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
पोलिस निरिक्षक उदय झावरे यांची भूमिका संशयास्पद असून त्यांच्यावर दोन दिवसांत कारवाई करावी, त्यांची प्रथम बदली करा, तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी दुसऱ्या तपास अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अन्यथा संगमेश्वर तालुक्यात सर्वपक्षीय बंदची हाक देण्यात येईल. त्याचप्रमाणे मोर्चाही काढण्यात येईल.,असे उबाठाचे तालुकाध्यक्ष बंड्या बोरुकर यांनी पत्रकार पषिदेत सांगितले. यावेळी माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी सभापती छोट्या गवाणकर, उबाठाचे रोहित तांबे, राष्ट्रवादीचे निलेश भुवड, बाबा बोथले आदी उपस्थित होते.









