Wednesday, May 13, 2026
spot_img
Home गुन्हेगारी खोदकामात ३.७८ लाखांच्या विद्युत वाहिनीचे नुकसान

खोदकामात ३.७८ लाखांच्या विद्युत वाहिनीचे नुकसान

मुकादमावर गुन्हा दाखल; खेड येथील घटना

खेड:- महावितरणने स्पष्ट सूचना देऊनही मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर निष्काळजीपणे खोदकाम केल्यामुळे महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात संबंधित कामाच्या मुकादमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक २५ जानेवारी रोजी सकाळी वेरळ येथील हॉटेल गणपती कृपाच्या विरुद्ध दिशेला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर हे खोदकाम सुरू होते. ‘मे. दिनेश इंजिनिअरिंग’ कडून भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम सुरू असताना, महावितरणचे साहाय्यक अभियंता सिद्धार्थ सुनील पेटकर यांनी तिथे उपस्थित असलेले मुकादम राजेश हळदणकर यांना विद्युत वाहिनी असल्याने खोदकाम न करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष करून खोदकाम सुरूच ठेवण्यात आले. यामुळे महावितरणची ११ किलोव्होल्ट भरणे फीडरची विद्युत वाहिनी तुटली असून, यामध्ये महावितरणचे अंदाजे ३,७८,९०८ रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

​या प्रकरणी महावितरणचे साहाय्यक अभियंता सिद्धार्थ पेटकर (वय २८, रा. स्नेह अपार्टमेंट, वेरळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुकादम राजेश हळदणकर (रा. संगमेश्वर) याच्यावर ​भारतीय न्याय संहिता २०२३: कलम ३२४(३), ३२४(५), कलम १३८ कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे:

​या घटनेचा अधिक तपास खेड पोलीस करत आहेत. सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे आणि कामात अडथळा निर्माण करणे यामुळे संबंधित मुकादमाच्या अडचणीत वाढ झाली आहे.