जाकादेवी बाजारपेठेत मटका जुगारावर पोलिसांचा छापा; एकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत जाकादेवी बाजारपेठेत मटका जुगार चालवणाऱ्या एका इसमावर कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली आहे.

​शनिवार, २४ जानेवारी रोजी सकाळी ८:५० वाजण्याच्या सुमारास खालगाव जाकादेवी बाजारपेठेतील एका टपरीच्या आडोशाला मटका जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला.

​या छाप्यात संतोष दाजी धामणे (वय ५३ वर्ष, रा. खालगाव जाकादेवी भटवाडी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून कल्याण मटका जुगाराचे साहित्य आणि ५२० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. आरोपी हा कोणत्याही परवान्याशिवाय बेकायदेशीरपणे हा जुगार खेळवत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

​या प्रकरणी पोलीस हवालदार बाजीराव नारायण कदम यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.