Monday, May 11, 2026
spot_img
Home रत्नागिरी रनप उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपचे राजेश तोडणकर यांचे नाव आघाडीवर

रनप उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपचे राजेश तोडणकर यांचे नाव आघाडीवर

स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेत अनेक इच्छुक

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासह तीन स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीसाठी 12 जानेवारी रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. उपनगराध्यक्ष पद ठरल्या प्रमाणे भाजपकडे देण्यात येणार असून या पदासाठी भाजपचे नगरसेवक राजेश तोडणकर यांचे नाव आघाडीवर आहे. तीन स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार असून तीनपैकी दोन नगरसेवक शिवसेनेचे तर एक भाजपचा होणार आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेत जोरदार रस्सीखेच असून भाजपकडून नगरसेवक पदाच्या नावावर एकमत झाले आहे.

शिवसेना-भाजप महायुतीने रत्नागिरी नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठा विजय मिळवत पालिकेवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 32 जागांपैकी 29 जागांवर महायुतीने विजय मिळाला. शिवसेनेला 23 आणि भाजपला 6 जागा मिळाल्या. सत्तेत भाजपला उपनगराध्यक्ष पदासह दोन समित्या मिळण्याची शक्यता आहे. 12 जानेवारी रोजी उपनगराध्यक्ष पदासह तीन स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात येणार आहे.
युतीत ठरलेल्या सूत्रानुसार नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष पद भाजपकडे असणार आहे. या पदासाठी भाजपकडून राजेश तोडणकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. या शिवाय समीर तिवरेकर आणि सुप्रिया रसाळ यांची नावे देखील चर्चेत आहेत. पुढील दोन दिवसात भाजप प्रमुख नेत्यांची बैठक घेऊन उपनगराध्यक्ष पदाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार असल्याची माहिती आहे. उप नगराध्यक्ष पदासह तीन स्वीकृत सदस्यांची निवड या विशेष सभेत होणार आहे. भाजपकडून निलेश आखाडे यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे तर शिवसेनेकडून निवडून जाणाऱ्या दोन सदस्यांमध्ये प्रचंड चढाओढ आहे. एका जागेवर माजी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांची दावेदारी निश्चित मानली जात आहे.