चिपळूण:- तालुक्यातील खेर्डी भागातील अनेक व्यक्तींना सरकारी नोकरीत लावण्याचे आमिष दाखवून तब्बल ४० लाख ८५ हजार ५८४ रुपयांना लुटण्याला प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दि. ७ जानेवारी २०२६ रोजी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात महेश भास्कर म्हात्रे (रा. मु.पो. जिते, ता. पेण, जि. रायगड) याच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम ४२०, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिसेंबर २०२२ ते मे २०२४ या कालावधीत ही आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणातील फिर्यादी नितीन श्रीकांत रसाळ (वय ४०, व्यवसाय शेती, रा. बुरंबाड, वरचा वठार, शेवरवाडी, ता. संगमेश्वर) यांनी तक्रार दाखल केली असून संशयित आरोपी महेश म्हात्रे याने स्वतःची ओळख प्रभावशाली व्यक्ती असल्याची करून देत सरकारी खात्यात नोकरी लावून देतो असे खोटे आश्वासन फसवणूक झालेल्या व्यक्तींना दिले. या आमिषाने फिर्यादी रसाळ यांच्याकडून ६ लाख रुपये तसेच इतर सात जणांकडून मिळून एकूण १८ लाख २५ हजार रुपये घेतले गेले.
मात्र त्यानंतर ही कोणालाही सरकारी नोकरी न लावता घेतलेली रक्कम परत न करता आरोपीने सर्वांची आर्थिक फसवणूक केली. तसेच म्हात्रे याने नितीन रसाळ यांच्या नावावर जनता सहकारी बँक, शाखा चिपळूण व एच.डी.एफ.सी. बँक, शाखा चिपळूण येथे कर्ज प्रकरणे उघडून त्या कर्जाच्या आधारे युंदाई कंपनीची अल्काझार गाडी, बुलेट दुचाकी तसेच दोन मोबाईल फोन खरेदी केल्याचे तपासात उघड झाले आहे.
आरोपीने घेतलेल्या या कर्जाचे हप्ते मे २०२४ पासून भरलेले नसल्याने १६ लाख ६० हजार ५८४ रुपयांची कर्ज रक्कम अद्याप ही थकीत आहे. दरम्यान, फिर्यादी यांनी आरोपीकडे पैसे परत मागितले असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.









