Wednesday, May 13, 2026
spot_img
Home गुन्हेगारी देवरुखमध्ये गांजा सेवन करणाऱ्या  तरुणावर पोलिसांची कारवाई

देवरुखमध्ये गांजा सेवन करणाऱ्या  तरुणावर पोलिसांची कारवाई

देवरुख:- रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथे सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या एका मुंबईतील तरुणाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. देवरुख खालची आळी ते बौद्धवाडी दरम्यान असलेल्या पुलावर ही कारवाई करण्यात आली असून, संशयिताकडून गांजा सदृश अमली पदार्थाचे सेवन केले जात असल्याचे समोर आले आहे.

याबाबत देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, ५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांच्या सुमारास देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल तेजस मारुती देशमुख हे आपल्या सहकाऱ्यांसह गस्तीवर होते. यावेळी देवरुख खालची आळी ते बौद्धवाडीकडे जाणाऱ्या पुलावर एक तरुण संशयास्पदरीत्या अमली पदार्थाचे सेवन करताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचे नाव सुकृत श्रीश भोसले (वय ३४, मूळ रा. कांदिवली वेस्ट, मुंबई, सध्या रा. देवरुख खालची आळी) असल्याचे निष्पन्न झाले. तो बेकायदेशीरपणे गांजा सदृश पदार्थाचे सेवन करत असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी त्याला अटक केली.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल तेजस देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवरुख पोलीस ठाण्यात सुकृत भोसले याच्याविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम ८(अ) आणि २७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ५ जानेवारी रोजी रात्री ९ वाजून ४९ मिनिटांनी अधिकृतपणे नोंदवण्यात आली असून, या अमली पदार्थाच्या तस्करीचा किंवा सेवनाचा अधिक धागादोरा शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.