Thursday, May 7, 2026
spot_img
Home गुन्हेगारी कोंडगाव येथे वकिलाचे घर फोडून ५ लाखांच्या रोकडसह दागिने लंपास

कोंडगाव येथे वकिलाचे घर फोडून ५ लाखांच्या रोकडसह दागिने लंपास

संगणक, प्रिंटर, ४ हार्ड डिस्कसह शेती साहित्याची चोरी

साखरपा:- संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव केतकर गल्ली येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ७ लाख ६२ हजार ७०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सुबोध मोरेश्वर जोगळेकर यांनी देवरुख पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश करत रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, तांब्या-पितळेची भांडी आणि संगणक साहित्यावर डल्ला मारला आहे. फिर्यादी सुबोध जोगळेकर हे व्यवसायाने वकील असून ते सध्या पुणे जिल्ह्यातील हवेली येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे कोंडगाव येथील घर बंद असल्याचा फायदा उठवत चोरट्यांनी ३१ डिसेंबर २०२५ ते ३ जानेवारी २०२६ या दरम्यान ही चोरी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजावर जड हत्याराने प्रहार करून आतील कडी तोडली. त्यानंतर घरातील देवघर आणि बेडरुममधील कपाटाचे लॉकर फोडून त्यातील ५ लाख रुपयांची रोख रक्कम आणि १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले. चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये १५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि २० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन यांचा समावेश आहे. तसेच ३०० ग्रॅम वजनाचे चांदीचे गोळेही चोरट्यांनी पळवले आहेत. केवळ रोकड आणि दागिनेच नव्हे, तर चोरट्यांनी घरातील तांब्या-पितळेची जुनी भांडी, स्टीलची भांडी, गॅस सिलेंडरच्या टाक्या, शिलाई मशीनचा भाग आणि पाण्याची मोटर असे सर्वच साहित्य लंपास केले आहे.

या घरफोडीमध्ये ४०० किलो वजनाची तांब्याची भांडी, ज्यामध्ये कळशा, बादल्या, हंडे आणि तामन यांचा समावेश होता, तसेच पितळेच्या मोठ्या समयांचीही चोरी झाली आहे.

विशेष म्हणजे, चोरट्यांनी घरातील संगणक, प्रिंटर, इन्व्हेंटर आणि महत्त्वाचा डेटा असलेल्या ४ हार्ड डिस्क देखील चोरून नेल्या आहेत. याशिवाय शेतीकामासाठी लागणारी कुऱ्हाड, कुदळ, फावडी आणि विळे यांसारखे लोखंडी साहित्यही चोरट्यांनी सोडले नाही. या घटनेची माहिती मिळताच देवरुख पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कायद्याच्या कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ऐन नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच झालेल्या या मोठ्या घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.