Wednesday, August 12, 2026
spot_img
Home गुन्हेगारी वेरळ येथे ट्रक चालकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण

वेरळ येथे ट्रक चालकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण

खेडमधील दोघांवर गुन्हा दाखल

खेड:- खेड तालुक्यातील वेरळ येथे सर्व्हिस रोडवर गाडी थांबवून पाहणी करत असताना, ‘तुम्ही आम्हाला गाडीखाली मारले असते’ असा जाब विचारत दोघांनी मिळून ट्रक चालक आणि त्याच्या साथीदारांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
या मारहाणीत फिर्यादी जखमी झाले असून ट्रकच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले आहे. ही घटना २९ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सोहम किशोर मयेकर (वय २६, व्यवसाय ट्रान्सपोर्ट, रा. चिवेली, करंबेळीवाडी, ता. चिपळूण) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोहम मयेकर आणि त्यांचा भाऊ ओंकार मयेकर हे २९ डिसेंबरच्या मध्यरात्री आपल्या वाहनाने जात होते. वेरळ हद्दीत सर्व्हिस रोडवर त्यांनी गाडी थांबवली आणि खाली उतरून गाडी चेक करत होते. त्यावेळी आरोपी शुभम संतोष जाधव (वय २७, रा. भरणेनाका, ता. खेड) आणि ऋत्विक उत्तम चव्हाण (वय २३, रा. सवेणी, कातळ माळ, ता. खेड) हे त्या ठिकाणी आले.
शुभम जाधव आणि ऋत्विक चव्हाण यांनी फिर्यादी सोहम, त्यांचा भाऊ ओंकार किशोर मयेकर व विक्रम खांडेकर यांना ‘तुम्ही आम्हाला गाडीखाली मारले असते’ असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ करत हातातील लोखंडी रॉडने पायावर आणि हातावर मारून दुखापत केली. इतकेच नव्हे तर ‘तुम्हाला पोलिसांसमोर सुद्धा मारू’ अशी धमकी देत आरोपींनी हातातील रॉडने ट्रकच्या काचा फोडून नुकसान केले.

या घटनेनंतर जखमी सोहम मयेकर यांनी खेड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शुभम जाधव आणि ऋत्विक चव्हाण या दोघांविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम ११८(१), ३५२, ३२४(४), ३(५) आणि इतर संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.