बारामती न्यायालयाचा निर्णय
गुहागर:- बारामती परिसरात भोंदूबाबाच्या नावाखाली फसवणूक आणि अत्याचाराचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मिलिंद मदन जाधव (वय 50, रा. गुहागर, जि. रत्नागिरी) या व्यक्तीने “पैशांचा पाऊस पाडून श्रीमंत करून देतो” असे आमिष दाखवून अनेक महिलांची फसवणूक केली होती. या प्रकरणी बारामती न्यायालयाने त्याला दोषी ठरवत कठोर शिक्षा सुनावली आहे.
जिल्हा न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी दिलेल्या निकालानुसार, आरोपीला जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत 4 वर्षे सक्तमजुरी आणि 10000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच फसवणुकीच्या गुन्ह्यात 2 वर्षांची शिक्षा आणि 5000 रुपये दंड सुनावण्यात आला आहे.
मुळचा गुहागर येथील असलेल्या मिलिंद जाधव याने बारामती भागातील महिलांना ‘मला पैशांचा पाऊस पाडता येतो’ असे सांगून एका अघोरी पूजेचे आयोजन केले होते. या पूजेच्या नावाखाली महिलांना चुकीच्या पद्धतीने बसवून त्यांच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आला. तसेच पूजा करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या नावाखाली त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली गेली.
या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या महिलांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत यांनी केला आणि न्यायालयात पुरावे सादर केले.
सरकारी वकील ॲड. ज्ञानदेव शिंगाडे यांनी न्यायालयात सात साक्षीदार तपासले. सर्व पुरावे आणि दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायालयाने मिलिंद जाधव याला दोषी ठरवले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. आता न्यायालयाच्या निकालामुळे या प्रकरणाला शेवट मिळाला असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत. गुहागर- चिपळूण तालुक्यात मिलिंद जाधवकडून असे काही प्रकार झाल्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पुढे येऊन तक्रारी देणे गरजेचे असल्याची चर्चा परिसरात आहे.









