असुर्डेत विनापरवाना खैर वाहतुकीवर कारवाई

चिपळूण:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर असुर्डे येथे रविवारी सकाळी वनविभागाने कारवाई करत झेनॉन गाडीतून दहीवली येथील कातभट्टीवर विनापास वाहतूक करण्यात येणारे तब्बल ८० मण खैर लाकूड जप्त केले. त्यामुळे व्यावसायिकात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सुमारे ९.३० वाजता असुर्डे येथे वनविभागाच्या पथकाला झेनॉन गाडी संशयास्पदरित्या फिरताना दिसली. पथकाने तत्काळ गाडी थांबवून तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात खैर लाकूड आढळले. लाकूड वाहतुकीसाठी कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वनविभागाने गाडी ताब्यात घेऊन तेथील एका लाकूड मिलमध्ये जमा केली. गाडीची चावीही वन कर्मचाऱ्यानी ताब्यात घेत पुढील चौकशी केली. यामध्ये ही गाडी साखरपा येथील असून खैर लाकूड दहीवली येथील कात-भट्टीकडे विनापरवाना नेण्यात येत होते. दरम्यान यासंदर्भात सावर्डेतील वनपाल कार्यालयात संपर्क साधला असता कुणीही या कारवाईबाबत माहिती देण्यास पुढे आलेले नाही. त्यानंतर परिक्षेत्र वनाधिकारी सरवर खान यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी माहिती देताना संबंधित गाडीत ८० मण खैर लाकूड होते. त्यामुळे लाकूडसह गाडी जप्त करण्यात आली असून चालकावर गुन्हाही दाखल करण्यात आल्याचे सांगितले.