सीलिंग फॅनपासून हायड्रॉलिक पंपापर्यंत मुद्देमाल लंपास
खेड:- खेड तालुक्यातील काडयली येथील एका स्टोन क्रशर व्यवसायाच्या ठिकाणी काम करणाऱ्या एका कामगारानेच मालकाच्या संमतीशिवाय सुमारे २ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७.०० ते १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास हा चोरीचा प्रकार घडला. या घटनेनंतर आठ दिवसांनी, २६ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री उशिरा खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी प्रथमराव रविंद्र पालांडे देशमुख (वय ३२, व्यवसाय स्टोन क्रशर, रा. धामणंद, खेड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी यांच्या मालकीचा काडयली (ता. खेड) येथील स्टोन क्रशर असून, तिथे ‘शाहरुख’ नावाचा (पूर्ण नाव आणि गाव अज्ञात) एक कामगार काम करत होता. याच कामगाराने १७ आणि १८ नोव्हेंबरच्या रात्रीच्या सुमारास स्टोन क्रशरमधील विविध साहित्य लबाडीच्या इराद्याने आणि मालकाच्या संमतीशिवाय चोरून नेले.
या चोरीत एकूण २ लाख ८६ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. चोरून नेलेल्या साहित्यामध्ये प्रामुख्याने स्टोन क्रशरसाठी लागणारे महागडे पार्ट आणि इलेक्ट्रीकल्स साहित्य यांचा समावेश आहे. यात ४,००० रुपये किमतीचे ओरियंट कंपनीचे दोन सीलिंग फॅन, ३,००० रुपये किमतीचे दोन पांढऱ्या रंगाच्या लाईटचे एमसीबी, तसेच ३२,००० रुपये किमतीचे पॉलीकॅब कंपनीच्या १.५ एमएम जाडीच्या इलेक्ट्रीक वायरचे १६ बंडल चोरीला गेले आहेत. याशिवाय ५,००० रुपये किमतीची एक पिवळ्या रंगाची ग्राइंडर मशीन, १२,००० रुपये किमतीचे दोन पिवळ्या रंगाचे स्पॅनर बॉक्स सेट, क्रशर मशीनच्या कन्वेअर बेल्टच्या १६ बेअरिंग (किंमत ८०,००० रुपये) आणि सर्वात महागडा असा पोकलेन मशीनच्या इंजिन पार्टमधील १ लाख ५० हजार रुपये किमतीचा एक हायड्रॉलिक पंपही चोरट्याने चोरून नेला आहे.
कामगारानेच विश्वासघात करत एवढ्या मोठ्या किमतीचा ऐवज लंपास केल्यामुळे फिर्यादी प्रथमराव देशमुख यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून अज्ञात आरोपी शाहरुखविरुद्ध भारतीय दंड संहिता कायदा ३०६ (चोरी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे स्टोन क्रशर व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, खेड पोलीस आता आरोपी शाहरुखचा शोध घेत आहेत.









