Saturday, June 20, 2026
spot_img
Home लांजा मोकाट गुरे सोडणाऱ्या मालकांवर गुन्हा दाखल

मोकाट गुरे सोडणाऱ्या मालकांवर गुन्हा दाखल

लांजा:- तालुक्यातील बेनीखुर्द खेरवसे ग्रामपंचायतीने वारंवार सूचना देवूनही त्याकडे दुर्लक्ष करून मोकाट गुरे सोडणाऱ्या धुंदरे येथील तीन गुरे मालकांवर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जून २०२४ ते ११ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत लांजा ते धुंदरे या रस्त्यावर येथील गुरे मालक रवींद्र बालशेठ गांधी (५८), बाबल्या पांडुरंग लांबोरे (५७) व प्रभाकर कृष्णा लिंगायत (५२, सर्व रा. धुंदरे लांजा) हे आपली गुरे मोकाट सोडत होते. ही गुरे लांजा-धुंदरे या रस्त्यावर मोकाटपणे फिरत असतात. तसेच रस्त्यात बसंत असल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या दुचाकी, चारचाकी व अन्य वाहनांना मोठा अडथळा निर्माण होत होता. त्याचप्रमाणे काही छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटनाही घडत होत्या. या प्रकरणी बेनीखुर्द खेरवसे ग्रामपंचायतीच्या सरपंच रुपाली लोटणकर यांनी संबंधित गुरे मालकांना आपली गुरे मोकळी न सोडता ती बांधून ठेवावीत, अशा सूचना केल्या होत्या. मात्र त्यांच्या या सूचनेकडे या तीनही गुरे मालकांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अखेर सरपंच लोटणकर यांनी लांजा पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार, लांजा पोलिसांनी वरील तीनही गुरे मालकांवर गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे करत आहेत.