विनापरवाना बंदूक बाळगल्या प्रकरणी गावखडीतील एकावर गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील गावखडी येथे विना परवाना सिंगल बॅरल बंदूक आणि 8 जिवंत काडतूसे बाळणार्‍या विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार 1 ऑगस्ट रोजी रात्री 8 वा.सुमारास करण्यात आली. त्याच्याकडून एकूण 22 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नरेश भिकाजी गुरव (62,रा.गुरववाडी गावखडी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल प्रकाश झोरे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी रात्री संशयित हा गावखडी येथील गुरववाडी ते पवारवाडीकडे जाणार्‍या कच्च्या रस्त्यालगत डुबलाची धार येथे आपल्या ताब्यात सिंगल बॅरल बंदूक आणि 8 जिवंत काडतूसे आपल्या जवळ बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात शस्त्र अधिनियम कलम 3 (1),25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.