Wednesday, May 13, 2026
spot_img
Home गुन्हेगारी मनोरुग्ण तरुणाला मारहाणप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा

मनोरुग्ण तरुणाला मारहाणप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी येथे उपचार घेत असलेल्या एका २३ वर्षीय तरुणाला अज्ञात व्यक्तीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना ६ जून रोजी सकाळी ११ वाजण्यापूर्वी घडली. या मारहाणीत तरुणाच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत होऊन जबड्याचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरीफा मुनाफ फणसोपकर (वय ४५, रा. राजीवडा नाका, कौशल्या प्लाझा, रत्नागिरी) यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादींचा मुलगा मन्नान मुनाफ फणसोपकर (वय २३) हा मानसिक उपचारांसाठी रत्नागिरी येथील मनोरुग्णालयात दाखल होता. ६ जून रोजी सकाळी अज्ञात व्यक्तीने त्याला मारहाण केली. मारहाणीनंतर मन्नानला तात्काळ रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तेथील उपचारानंतर पुढील उपचारांसाठी त्याला चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी अर्जाच्या चौकशीतून, मन्नानच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले आहे.
या घटनेमुळे मनोरुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला असून, मारहाण करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.