Friday, May 15, 2026
spot_img
Home गुन्हेगारी खेर्डी आठवडा बाजारात मोठा राडा; महिलेला झालेल्या मारहाणीमुळे जमाव आक्रमक

खेर्डी आठवडा बाजारात मोठा राडा; महिलेला झालेल्या मारहाणीमुळे जमाव आक्रमक

चिपळूण:- शहरालगतच्या खेर्डी उपनगरातील बुधवार आठवडा बाजारात काल सायंकाळी अगरबत्ती खरेदीवरून मोठा वादंग निर्माण झाला. ग्राहक आणि महिला विक्रेत्या यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने एका महिलेला मारहाण झाल्याचा प्रकार घडला. यामुळे संतप्त जमाव संशयित आरोपीला अटक होईपर्यंत शांत होण्यास तयार नव्हता, त्यामुळे खेर्डी येथे पोलीस बळ पाचारण करावे लागले.

चिपळूण तालुक्यातील सर्वात मोठा आठवडा बाजार म्हणून खेर्डी येथील बुधवार बाजार ओळखला जातो. याच ठिकाणी काल सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. खेर्डी-भुरणवाडी गावातील बचत गटाचे साहित्य विक्री करणाऱ्या एका महिलेसोबत ही घटना घडली. आठवडा बाजारात नुकताच विदेशातून सुट्टीवर आलेल्या एका व्यक्तीने अगरबत्तीचा पुडा घेऊन व्यावसायिकेच्या पुढ्यात वीस रुपये टाकून तो निघाला. मात्र, एवढ्या रुपयात अगरबत्तीचा पुडा येणार नाही, असे विक्रेत्या महिलेने सांगितल्यानंतर या तरुणाने उद्दामगिरी दाखवल्याने वादंग निर्माण झाला. विदेशातून आलेल्या या इसमात आणि महिला विक्रेत्यामध्ये पैशाच्या देवाणघेवाणीवरून बाचाबाची झाली. केवळ काही रुपयांच्या हिशोबावरून हा वाद वाढत गेला. यातून या महिलेला मारहाण झाल्याने मोठा वादंग निर्माण झाला आणि जमाव जमा झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी खेर्डी येथे धाव घेतली. या प्रकरणी मध्यरात्री उशिराने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे वृत्त आहे.