नाटे खून प्रकरणी दोघांना २० मेपर्यंत पोलीस कोठडी

राजापूर:- राजापूर तालुक्यातील नाटे ठाकरेवाडी येथे घडलेल्या खून प्रकरणातील दोन्ही संशयित आरोपींना २० मे २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संशयित आरोपींची नावे चंद्रकांत लहू ठाकरे आणि त्याचा मुलगा अमोल चंद्रकांत ठाकरे अशी आहेत.

दोघांनाही शुक्रवारी पोलिसांनी अटक केली होती. शनिवारी त्यांना राजापूर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना २० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याबाबत माहिती नाटे सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांनी दिली.

प्राथमिक तपासानुसार, दारूच्या नशेत किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर संशयित चंद्रकांत ठाकरे आणि त्याचा मुलगा अमोल यांनी स्वप्नील लहू ठाकरे (वय ४५) याच्यावर मारहाण केली. ही मारहाण इतकी गंभीर होती की त्यात स्वप्नीलचा मृत्यू झाला.

या प्रकरणात नाटे सागरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू असून, खूनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.