विदेशात पाठवलेल्या पार्सलबाबत बतावणी करत ऑनलाईन फसवणूक

रत्नागिरी:- तुम्ही तैवान या देशात पाठवलेल्या पार्सलमध्ये बेकायदेशीर वस्तू मिळून आली आहे . तुमच्यावर क्रिमिनल ऑफेन्स दाखल होईल अशी बतावणी करत फिर्यादीची ऑनलाईन २५ हजार ५२५ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली . फसवणुकीची ही घटना २५ जून रोजी सायंकाळी ५ ते ७.३० वाजता या कालावधीत अभ्युदय नगर येथे घडली आहे . याप्रकरणी गौतम कुमार, बालसिंग राजपूत आणि अन्य एकजण या तिघांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने ( पोलिसांनी नाव जाहीर केले नाही ) दिलेल्या तक्रारीत , २५ जून रोजी सायंकाळी त्यांच्या मोबाईलवर सशियितांनी फोन करुन तुम्ही तैवानला पाठवलेल्या पार्सलमध्ये बेकायदेशीर वस्तू मिळून आल्याचे खोटे सांगितले . तसेच याप्रकरणी तुमच्यावर क्रिमिनल ऑफेन्स दाखल होईल , अशी भीती दाखवून स्काईप या सोशल मीडिया ॲपचा वापर करुन फिर्यादीकडून त्यांची माहिती प्राप्त करून घेतली . त्यानंतर गुगल पे नंबरवरुन त्यांच्या बँक खात्यातून २५ हजार ५२५ रुपये स्वीकारून ऑनलाईन फसवणूक केली .