हॉटेलच्या रूमचे छत कोसळून मुंबईतील पर्यटक कुटुंब जखमी

मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल

दापोली:- दापोली तालुक्यातील जालगाव येथील ‘हॉटेल चिरा मिडॉस’मध्ये हॉटेलच्या रूमचे छत कोसळल्याने मुंबईतील एकाच कुटुंबातील सदस्य जखमी झाले आहेत. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात हॉटेल मालक आणि बांधकाम कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील मुलुंड (पश्चिम) येथील रहिवासी विकास तिवारी (वय ४८ वर्षे) हे आपल्या कुटुंबासह पर्यटनासाठी दापोली येथे आले होते. ते जालगाव येथील हॉटेल चिरा मिडॉस मधील रूम नंबर १०६ मध्ये मुक्कामाला होते. ३० डिसेंबर २०२५ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास अचानक या रूमच्या छताचा भाग खाली कोसळला.

या घटनेत विकास तिवारी, त्यांची पत्नी साधना तिवारी (वय ४५ वर्षे) आणि त्यांचा मुलगा यांना किरकोळ दुखापत झाली आहे. छताचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे आणि ते मोडकळीस आले आहे याची कल्पना असूनही हॉटेल मालकाने ती रूम पर्यटकांना भाड्याने दिली, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. निष्काळजीपणामुळे कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी फिर्यादी विकास तिवारी यांच्या तक्रारीवरून दापोली पोलिसांनी हॉटेल मालक डॉ. राजेंद्र जगदाळे आणि संबंधित बांधकाम कंत्राटदार यांच्याविरुद्ध ३० डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.