दापोली:- दापोली तालुक्यातील हर्णे येथील किल्ल्यावर झालेल्या मारहाण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ८ संशयित आरोपींची जिल्हा सत्र न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे.
दिनांक २७ मे रोजी सायंकाळी ६:३० च्या सुमारास फिर्यादी विनय सुधीर गुरव (वय २३) आणि जखमी महेंद्र हरिश्चंद्र खेडुकर (वय २८) हे दोघे हर्णे येथील किल्ल्यावर फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या आरोपींनी ‘व्हिडिओ का ग्रुपवर टाकलास?’ अशी विचारणा करत फिर्यादी आणि जखमींना शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली.
फिर्यादीनुसार, आरोपींनी लोखंडी सळी आणि लाथाबुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत फिर्यादी व जखमी गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेबाबत दापोली पोलीस ठाण्यात गु.र.नं. १०९/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०९, ९६(२), १११(२), १११(३), १९०, १९१(२), ३५२ आणि ३५१(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी दापोली पोलिसांनी २९ मे २०२६ रोजी इम्रान असलम इन्सफकर, मुनिफ जावेद शेखकर, सलाद हसन कोडिबलर, नवेद निसार काझी, जैद ताजुद्दीन जामदार, हुजैफ अजीम इन्सफकर आणि नाईफ आरिफ शेखचांदकर (सर्व रा. हर्णे बंदर मोहल्ला, ता. दापोली) यांना अटक केली होती.
संबंधित आरोपींच्या वतीने खेडचे वकील अॅड. सुधीर बुटाला यांनी जिल्हा न्यायाधीश खेड यांच्या न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत, संशयित आरोपींना जामीन मंजूर केला.









