‘स्थानिक गुन्हे अन्वेषण’च्या कारवाईत ७७ हजारांचे ब्राऊन हेरॉईन जप्त; एकजण ताब्यात

रत्नागिरी:- जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी जयस्तंभ परिसरातून ७७ हजार ५०० रुपये किंमतीचे ब्राऊन हेरॉईन जप्त केले असून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला अंमली पदार्थांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रविवार ०६ एप्रिल रोजी रत्नागिरी शहरात रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गस्त घालत होते.

दुपारी ३ वाजून १० मिनिटांच्या सुमारास गोपनीय माहिती मिळाली की, जयस्तंभ येथील हॉटेलच्या बाजूला एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करत आहे. त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तिथे आरोपी अरमान आदिल अशरफ शेख हा त्याच्या दुचाकी वाहनावर बसलेला आणि हातात एक पिशवी घेतलेला दिसला.

पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्याच्या ताब्यातून ब्राऊन हेरॉईन या अंमली पदार्थाच्या एकूण १५ पुड्या आणि इतर साहित्य मिळून आले. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची एकूण किंमत ७७ हजार ५०० रुपये आहे. पोलिसांनी आरोपी अरमान आदिल अशरफ शेख याला ताब्यात घेतले.

याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १०३१/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक, रत्नागिरी आणि अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे, सहा. पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद वाघ, पोलीस हवालदार शांताराम झोरे, बाळू पालकर, दिपराज पाटील आणि गणेश सावंत यांनी केली आहे.