रत्नागिरी:- मिरजोळे-नाखरेकरवाडी येथील भक्ती मयेकरसह आणखीन दोन खूनात सामिल दोघांना शहर पोलिसांनी रविवारी अटक केली. न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दुर्वास दर्शन पाटील (वय २५, रा. जंगमवाडी, वाटद खंडाळा) व विश्वास विजय पवार (४१, ऱा. कळझोंडी रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत.
मिरजोळे येथील रहिवासी भक्ती मयेकर हिचा खून केल्यानंतर आणखीन दोन खून केल्याचे संशयित दुर्वास पाटील यांच्याकडून उकल झाली होती. २९ एप्रिल २०२४ ला तालुक्यातील कळझोंडी येथील रहिवासी सिताराम लक्ष्मण वीर (वय ५५ ) यांना संशयित दुर्वास आणि विश्वास यांनी बारमध्ये जीव जाईपर्यंत मारहाण केली होती. त्यांना चक्कर आल्याचा बहाणा करुन उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र खंडाळा येथे दाखल केले होते. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. मृत सिताराम वीर हा प्रेमसंबध असलेल्या भक्ती मयेकर हिच्याशी फोनवरुन बोलत असल्याचेही पुढे आले होते. या कारणातून त्याचा काटा काढण्यात आला असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर सिताराम वीर झालेली मारहाण ही त्यांचा साथीदार राकेश जंगम याला माहिती होते. राकेश कडून या सर्व प्रकरणाची उकल होईल या भितीने राकेश जंगमला कोल्हापूरला जायचे आहे असे सांगून घरातून बोलावून घेतले आणि कोल्हापूरला जात असताना गाडीत गळा आवळून मारुन आंबा घाटातच फेकून दिले होते.
एक खून पचल्यानंतर दुर्वास व त्याचा साथीदार यांनी एक वर्षापूर्वी दोन खून केल्यानंतर भक्ती मयेकरचा खून केला. भक्ती मयेकरच्या खुनाची उकल झाल्यानंतर मुख्य संशयित दुर्वास याने इतर दोन खूनाची पोलिसांना कबुली दिली होती. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. मात्र या तिहेरी खूनातील सिताराम वीर यांच्या खून प्रकरणात सामिल असलेले दुर्वास पाटील आणि विश्वास पवार याना पोलिसांनी रविवारी (ता.१४) पुन्हा अटक केली. न्यायालयाने चार दिवसांची म्हणजेच बुधवारी (ता. १७) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.