Thursday, November 19, 2026
spot_img
Home गुन्हेगारी सावर्डे हद्दीतील घरफोडी चोरीचा गुन्हा उघड; चौघांना अटक

सावर्डे हद्दीतील घरफोडी चोरीचा गुन्हा उघड; चौघांना अटक

४ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी:- सावर्डे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडी व चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील चार आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीच्या बॅटऱ्या, गुन्ह्यात वापरलेले वाहन व इतर साहित्यासह एकूण ४ लाख २२ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

​सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित वाहन व आरोपींचा शोध सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक शासकीय वाहनाने रत्नागिरी ते चिपळूण विभागात गस्त घालत होते. दरम्यान, बुधवार, दिनांक १८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री सुमारे १२.१५ वाजता मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी फाट्याच्या पुढे असलेल्या ‘ग्रीन पार्क फॅमिली रेस्टॉरंट’ समोर संशयित वाहन उभे असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पोलिसांनी पंचांसमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये खालील चार जण आढळून आले. यात जयप्रकाश एकनाथ चिंदरकर (वय ३२ वर्षे, रा. विरार पूर्व, गणपती मंदिर शेजारी, जि. पालघर)
​नवनाथ भगवान उतेकर (वय ३६ वर्षे, रा. साईनाथ, साई सावली अपार्टमेंट, विरार पूर्व, जि. पालघर)
​कौशिक प्रभाकर जाधव (वय २७ वर्षे, रा. येसूबाई कंपाऊंड, सिद्धिविनायक बी विंग, विरार, जि. पालघर)
​मंगेश मनोज गुरव (वय २० वर्षे, रा. मोरेगाव तलाव, नालासोपारा, जि. पालघर) यांचा समावेश होता.

आरोपींनी चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या मोबाइल टॉवरच्या तीन बॅटऱ्या (किंमत २२,५०० रुपये), गुन्ह्यात वापरलेले साहित्य आणि संशयित वाहन असा एकूण ४,२२,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले आरोपी आणि हस्तगत मुद्देमाल पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी सावर्डे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
​ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली पो.हवा. विजय आंबेकर (९०९), पो.हवा. वैभव मोरे (१२२८), पो.हवा. गणेश सावंत (३०६) आणि चा.पो.हवा. अतुल कांबळे (२१५) यांच्या पथकाने केली.