चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील तुरंबव फाट्याजवळ एका मॅक्स गाडीला दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका १७ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.
ही घटना ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी मॅक्स गाडीचे चालक प्रशांत कृष्णाजी पंडित (वय ५०, रा. तुरंबव, चिपळूण) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीनुसार, प्रशांत पंडित हे त्यांची मॅक्स गाडी (क्र. एमएच १० इ ७९४० ) घेऊन मांडकीहून तुरंबवच्या दिशेने येत होते. तुरंबव फाट्याजवळ समोरून येणाऱ्या एका टर्नर कंपनीच्या दुचाकीने (क्र. एमएच २ बीसी १२२५) त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी चालक निलेश विनायक नाचरे (वय ४७, रा. निवळी, चिपळूण) यांनी रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता निष्काळजीपणे गाडी चालवल्यामुळे हा अपघात घडला. धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीवर मागे बसलेली त्यांची मुलगी या अपघातात गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात दुचाकी चालक निलेश नाचरे हे स्वतःही गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत दोन्ही वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. प्रशांत पंडित यांच्या तक्रारीनंतर सावर्डे पोलिसांनी आरोपी निलेश नाचरे यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.









