सळ्यांच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या ट्रक चालकाचा मृतदेह विहिरीतून काढला बाहेर

सुरक्षिततेच्या अभावामुळे २५ वर्षीय तरुणाने गमावला प्राण; क्रेनच्या साहाय्याने मृतदेह बाहेर

रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील हातखंबा येथे रविवारी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रक सुमारे पंधरा फूट खोल विहिरीत कोसळून झालेल्या या दुर्घटनेत चालक विशाल गोकुळ माने (वय २५, रा. धाराशिव) यांचा जागीच मृत्यू झाला. सळ्यांच्या ढिगाऱ्यात आणि ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाल्याने विशाल यांचा मृतदेह शोधण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली. अखेर रविवारी रात्री उशिरा क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त ट्रक बाहेर काढल्यानंतर हा मृतदेह हाती लागला. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत असतानाच, महामार्गावरील ठेकेदार कंपनीच्या निष्काळजीपणामुळेच हा बळी गेल्याचा संतप्त आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोखंडी सळ्या वाहून नेणाऱ्या ट्रकने हातखंबा परिसरात सलग काही वाहनांना धडक दिली. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक थेट रस्त्यालगत असलेल्या एका जुन्या विहिरीत कोसळला. ट्रक विहिरीत पडताना त्यातील लोखंडी सळ्या थेट केबिनमध्ये घुसल्या, ज्यामुळे केबिनचा अक्षरशः तुकडा न तुकडा झाला. सुरुवातीला ट्रकमधील दोन ते तीन जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र चालक विशाल माने यांचा कोणताही थांगपत्ता लागत नव्हता. ट्रकचा काही भाग विहिरीच्या पाण्यात आणि काही भाग सळ्यांच्या ढिगाऱ्याखाली दाबला गेल्याने शोधकार्यात अडथळे येत होते. अखेर क्रेन पाचारण करून ट्रक उचलला असता, अत्यंत छिन्नविछिन्न अवस्थेत विशाल यांचा मृतदेह आढळून आला.
या भीषण अपघाताने महामार्गाच्या कामातील त्रुटी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणल्या आहेत. हातखंबा परिसरात महामार्गाचे काम सुरू असतानाही त्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा यंत्रणा कार्यरत नसल्याचे निदर्शनास आले आहे. रस्त्यावरील धोकादायक वळणे, डायव्हर्जनचे फलक, रात्रीच्या वेळी दिसणारे रेडियम स्टिकर्स आणि पुरेशी प्रकाशयोजना यांचा पूर्णतः अभाव असल्याने हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. ठेकेदार कंपनी केवळ नफा कमवण्याच्या उद्देशाने काम करत असून, वाहनचालकांच्या जीवाशी खेळ मांडला जात असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. जर वेळीच या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना केल्या असत्या, तर धाराशिवच्या या तरुण चालकाचा जीव वाचला असता, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.