महिलेचा भाजून मृत्यू; दोन अधिकाऱ्यांना अटक
खेड:- तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक परिसरात रासायनिक प्रक्रियेतून तयार झालेल्या गरम मातीमुळे महिलेचा मृत्यू झाला. या गंभीर प्रकरणात पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असला तरी कंपनीमालकाला गजाआड करण्यात पोलिसांना अद्याप अपयश आल्याने संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी व्यवस्थापनातील दोन अधिकाऱ्यांना दोन दिवसांपूर्वी अटक केली असून, पुढील तपास खेड पोलिस करत आहेत.
ही घटना २२ मार्च रोजी दुपारी लोटे परशुराम एमआयडीसी परिसरातील पुष्कर कंपनीच्या आवारात घडली. याबाबत ललिता चंद्रकांत सोनवणे (वय ४०, रा. बहादूरशेख नाका, ता. चिपळूण) यांनी फिर्याद दिली आहे. त्या मृत शंकुतला बबन सोनवणे (वय ४८) त्यांच्या चुलत सासू होत. याप्रकरणी कंपनीचे मालक गौतम मखारिया, सेफ्टी मॅनेजर सुधाकर जगताप, एचआर मॅनेजर सचिन मनवळ, कमर्शियल मॅनेजर रवींद्रकुमार भुतिया तसेच इतर संबंधित व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ३ एप्रिलला सचिन मनवळ (वय ४३, रा. भरणे बाईतवाडी) व रवींद्रकुमार भुतिया (वय ५३, रा. चिपळूण) यांना अटक केली आहे.









