Wednesday, May 27, 2026
spot_img
Home संगमेश्वर संगमेश्वर कनकाडी परिसरात वणवा; ६०० काजू कलमे जळून खाक

संगमेश्वर कनकाडी परिसरात वणवा; ६०० काजू कलमे जळून खाक

१० बागायतदारांचे लाखोंचे नुकसान

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे–कनकाडी परिसरात शुक्रवारी दुपारी उसळलेल्या भीषण वणव्याने कष्टकरी बागायतदारांची स्वप्ने अक्षरशः राखेत मिसळली. अवघ्या काही क्षणांत ६०० काजू कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. तब्बल वीस वर्षांची मेहनत, पाणी, काळजी आणि आशा—सगळे काही डोळ्यादेखत जळून खाक झाले. दहा बागायतदारांचे लाखोंचे नुकसान झाले असून संपूर्ण परिसर हळहळीत बुडाला आहे.

आग लागल्याची बातमी कळताच श्री.विलास सोना सुकम,सोना सखाराम सुकम, रमेश लक्ष्मण जाधव, भीमराज चंद्रकांत जाधव, अनंत लक्ष्मण जाधव, प्रदीप सखाराम जाधव, प्रकाश गोविंद जाधव, संदीप जयराम जाधव, प्रकाश कृष्णा गराटे आणि बाबू लक्ष्मण जाधव हे बागायतदार जीवाची पर्वा न करता घटनास्थळी धावले.

हातात पाणी, फांद्या,माती ज्या मिळतील त्या साधनांनी आगीवर नियंत्रण मिळवण्या चा त्यांनी शर्थीचा प्रयत्न केला.मात्र वाऱ्या चा जोर आणि सुकलेल्या गवताचे ज्वलन शील साम्राज्य यामुळे आग राक्षसी वेगाने पसरली आणि बाग वाचवणे अशक्य ठरले.

स्थानिक शेतकऱ्यांनी भातशेतीचे प्रमाण कमी केल्याने शेतांमध्ये वाढलेले सुकलेले गवत वणव्यासाठी इंधन ठरत आहे.याच कारणामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचा संतापजनक आरोप ग्रामस्थांनी केला.काही मिनिटांतच आगीने काजू बाग अक्षरशः जळून गेल्या.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामे सुरू केले. कृषी अधिकारी श्री. चौगुले, तलाठी डोंगरे, पोलीस पाटील सौ. खांदारे, तसेच माजी उपसरपंच हेमंत शिंदे यांनी प्रत्यक्ष बागेत जाऊन पाहणी केली.उत्पन्नाच्या उंबरठ्यावर असलेली,वीस वर्षांची झाडे कोळशात रूपांतरित झाल्याचे दृश्य पाहून अधिकाऱ्यांनीही हळहळ व्यक्त केली.

वीस वर्षे आम्ही या झाडांना पाणी घालून, जीव ओतून वाढवले. आज ती राख झाली.केवळ पंचनामे नकोत त्वरित आणि योग्य नुकसान भरपाई मिळाली, तरच आम्ही उभे राहू, अशी आर्त मागणी हादरलेल्या बागायतदारांनी केली आहे. हा वणवा केवळ झाडांचा नाही—तो कष्ट, भविष्य आणि जगण्याच्या आशेचा होता. शासनाने तात्काळ पावले उचलली नाहीत, तर अशी राख पुन्हा उडेल, असा इशारा ग्रामस्थ देत आहेत