Wednesday, August 26, 2026
spot_img
Home संगमेश्वर विद्युतवाहिनी एसटी बसवर कोसळली; वाहकाला विजेचा धक्का

विद्युतवाहिनी एसटी बसवर कोसळली; वाहकाला विजेचा धक्का

चालक थोडक्यात बचावला; फणसवणे-उमरे फाट्यावरील घटना

संगमेश्वर:- संगमेश्वरहून उमरेकडे जाणाऱ्या एसटी बसवर अचानक विद्युतवाहिनी तुटून पडल्याने खळबळ उडाली. या दुर्घटनेत बसच्या वाहकाला विजेचा जोरदार धक्का बसून किरकोळ दुखापत झाली, तर चालकाने प्रसंगावधान राखल्याने तो थोडक्यात बचावला. बसमध्ये एकच प्रवासी असल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. ही घटना आज बुधवारी सकाळी ७-३० वा सुमारास फणसवणे नाका परिसरातील उमरे फाट्यावर रामदास मिसळ स्टॉलजवळ घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चालक रवींद्र साप्ते हे सकाळी सात वाजता संगमेश्वर बसस्थानकातून एमएच २० बीएल २१४८ क्रमांकाची उमरे एसटी घेऊन निघाले होते. बस फणसवणे येथील उमरे फाट्यावर पोहोचली असता रामदास मिसळ स्टॉलजवळील विद्युत खांबाच्या सपोर्टचा ताण तुटल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर विद्युतप्रवाह असलेली वाहिनी अचानक थेट सुरू असलेल्या एसटी बसवर कोसळली.

विद्युतवाहिनी बसवर पडताच वाहक प्राजक्ता शिगवण यांना विजेचा जोरदार धक्का बसला. मात्र त्यांनी प्रसंगावधान दाखवत सीटचा आधार घेतला. त्याचवेळी विद्युतप्रवाह बंद झाल्याने मोठा अनर्थ टळला आणि त्यांना किरकोळ दुखापत झाली.

या घटनेच्या वेळी चालक रवींद्र साप्ते हे चालकाच्या सीटवर अधांतरी स्थितीत असल्याने ते विजेच्या थेट संपर्कात येण्यापासून बचावल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांनाही कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.

बसमध्ये त्यावेळी एकच प्रवासी असल्याची माहिती मिळाली. तो सीटला टेकून बसला होता तसेच त्याच्या पायात चप्पल असल्याने त्याला विजेचा धक्का जाणवला नसल्याचे सांगण्यात आले. बसमध्ये प्रवाशांची संख्या मोठी असती तर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता होती. मात्र मोजकेच प्रवासी असल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कळविले. त्यानंतर लाईनमन होडे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विद्युतवाहिनी हटवून मार्ग सुरक्षित केल्याचे समजते.

दरम्यान, संगमेश्वर तालुक्यातील अनेक भागांमध्ये जीर्ण विद्युत खांब, तारा आणि वाहिन्यांची अवस्था चिंताजनक असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. रस्त्यालगत असलेल्या अशा धोकादायक विद्युत यंत्रणेकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन जीर्ण खांब व वाहिन्यांची तातडीने पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.

फणसवणे येथील या घटनेमुळे विद्युतवाहिन्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित विभागाने आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.