संगमेश्वरात घरात घुसून वृद्ध महिलेला मारहाण

भोपळ्याच्या वादातून तरुणाचा थरार

संगमेश्वर:- भोपळा नेण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या संघर्षात होऊन, एका तरुणाने घरात घुसून वृद्ध महिलेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी, म्हापार्लेवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (२४ मार्च) दुपारी ३:३० च्या सुमारास आरोपी सुधीर विष्णू दिवाळे (वय ४२) हा साक्षीदार प्रकाश धोंडू म्हापार्ले यांच्या घरातील भोपळा घेऊन जात होता. “भोपळा का नेतोस?” असे प्रकाश म्हापार्ले यांनी विचारले असता, आरोपी सुधीर याने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
​यावेळी तिथे उपस्थित असलेल्या फिर्यादी सानिका सचिन दिवाळे (वय ३५) यांनाही आरोपीने “तुम्हाला बघून घेतो, सुरा आणून एकेकाला भोसकेन,” अशी उघड धमकी दिली.

​दुपारचा हा वाद तिथेच थांबला नाही. रात्री ७:४५ च्या सुमारास फिर्यादी सानिका दिवाळे, स्वाती दिवाळे आणि सुनीता दिवाळे या घरात असताना आरोपी सुधीर दिवाळे हा अनाधिकृतपणे त्यांच्या घरात घुसला. “तुझा पती सचिन कुठे आहे? त्याला बघतोच,” असे म्हणत त्याने घरात धुडगूस घातला.
​यावेळी ७२ वर्षीय वृद्ध महिला सुनीता दत्ताराम दिवाळे यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्यांना जोरात ढकलून दिले. या धक्काबुक्कीत सुनीता दिवाळे जमिनीवर पडल्या आणि त्यांच्या कमरेला गंभीर दुखापत झाली आहे.
​या प्रकरणी सानिका दिवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमेश्वर पोलिसांनी आरोपी सुधीर विष्णू दिवाळे याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या ​कलम ३३३, ​कलम ३५२, ​कलम ३५१(३), ​कलम ११५(१) या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे:

​या घटनेचा अधिक तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत. किरकोळ कारणावरून ग्रामीण भागात वाढणाऱ्या अशा हिंसक प्रवृत्तीमुळे परिसरात चिंतेचे वातावरण आहे.