Friday, May 15, 2026
spot_img
Home गुन्हेगारी दारू पिण्यास मज्जाव केल्याने भावाला बेदम मारहाण

दारू पिण्यास मज्जाव केल्याने भावाला बेदम मारहाण

मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील कोन्हवली येथे एका खळबळजनक घटनेत, घराच्या बांधकामाच्या जागेवर दारू पिण्यास विरोध केल्याच्या कारणावरून सख्ख्या भावानेच आपल्या भावाला बांबूच्या काठीने बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​फिर्यादी दीपक पांडुरंग गमरे (वय ४८) आणि आरोपी निखिल पांडुरंग गमरे हे सख्खे भाऊ असून त्यांच्यामध्ये जमिनीवरून जुना वाद आहे. दीपक गमरे यांना ग्रामपंचायत देव्हारे यांच्याकडून घरकुल मंजूर झाले असून त्यांनी घराचे जोते बांधले आहे.
​२१ मार्च रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास, आरोपी निखिल हा या नवीन घराच्या जोत्यावर बसून दारू पीत होता. यावेळी दीपक यांनी त्याला “येथे दारू पिऊ नको, मला नवीन घराचे बांधकाम करायचे आहे,” असे समजावून सांगितले. याचा राग येऊन आरोपीने “ही जागा कोणाची आहे मला माहिती नाही, मी इथेच दारू पिणार, तुला जे करायचे ते करून घे,” असे म्हणत फिर्यादीला धक्काबुक्की व शिवीगाळ केली.

​या वादानंतर दीपक गमरे हे त्यांचे मित्र प्रकाश तांबे यांच्या घरी जाऊन बसले होते. मात्र, आरोपी निखिल तिथेही पोहोचला. त्याने दीपक यांना जमिनीवर ढकलून दिले आणि हातातील बांबूच्या काठीने त्यांच्या डाव्या हातावर व पायावर जबर मारहाण केली. तसेच पुन्हा शिवीगाळ करून जीवे मारण्याची दमदाटी केली.

​या घटनेनंतर दीपक गमरे यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार २५ मार्च रोजी दुपारी १:४० वाजता आरोपी निखिल गमरे याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि (३) अन्वये गुन्हा (गु.र.नं. ०९/२०२६) दाखल करण्यात आला आहे.