रत्नागिरी:- वाढदिवसानिमित्त व्हाट्स अँपवर ठेवलेल्या स्टेटसवरून तालुक्यातील चिंचखरी येथे जोरदार राडा झाला. रविवारी ही घटना घडली. लाकडी रिप घेऊन दोन्ही गट एकमेकांना भिडले. या प्रकरणी दोन्ही गटातील 12 जणांसह अन्य 10 ते 15 अनोळखी इसम यांच्यावर ग्रामीण पोलीस स्थानकात सोमवारी परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाढदिवसाच्या व्हाट्सअप स्टेटस वरून चिंचखरीत हा राडा पेटला. या प्रकरणी उमेश जनार्दन बोरकर आणि प्रवीण चंद्रकांत भाटकर यांनी परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. ग्रामीण पोलीस स्थानकात प्रवीण चंद्रकांत भाटकर, स्वप्नील संजय बोरकर, राजकुमार रमेश सुर्वे, ओंकार वीरेंद्र भाटकर, सोहम जयेंद्र भाटकर, राजेंद्र, कृष्णा भाटकर (सर्व रा. पहिलीवाडी, चिंचखरी) तर दुसऱ्या गटातील दीपक सुभाष बोरकर, विशाल जनार्दन बोरकर, उमेश जनार्दन बोरकर, संजय विजय बोरकर, सप्तमेश विजय बोरकर, गिरीश सत्यवान बोरकर यांच्यासह इतर 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हाट्स अँप वर ठेवलेल्या स्टेटस वरून हा वाद झाला. यात लाकडी रिपेने डोक्यावर व शरीरावर जोरदार फटके मारण्यात आले. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात मनाई आदेशाचा भंग तसेच मारहाण प्रकरणी भा. दं. वि. क. 143, 147, 148, 149, 324, 504, 506, 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.