रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात 31 डिसेंबर 2024 रोजी संपलेल्या वर्षात 86 गुन्हे पोलिसांकडे नोंदवले गेले. त्यात 4 कोटी रुपयांची फसवणूक
झाली. त्यापैकी 41 लाख रुपये रक्कम गोठवली गेली आणि एकाही व्यक्तीला एकाही रुपयाची रक्कम परत मिळू शकली नाही.
रत्नागिरी येथील पोलीस खात्याच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, गतवर्षी जिल्हाभरात विविध ठिकाणी सायबर फसवणुकीच्या 86 घटना नोंदवल्या गेल्या. दर आठवड्याला
एकाहून अधिक व्यक्तीची फसवणूक झाल्याने फिर्याद नोंदवली गेली. प्रत्येक प्रकरणात पोलिसांनी लक्षपूर्वक तपास केला. जिल्हास्तरावर स्वतंत्र सायबर गुन्हे तपास विभाग सध्या कार्यरत आहे. तेथे पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशिष्ट
लोकांचा तपास गट सतत तपासाचे काम करत असतो.
सायबर गुन्हेगार फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटस्ऍप, ट्वीटर, गुगल अशा विविध ठिकाणी कार्यरत आहेत. लोकांना अल्पावधीत मोठा परतावा अशाप्रकारचे आमिष दाखवले जाते किंवा तुम्ही अडचणीत आहात. सोडवायला आम्ही मदत करू
शकतो, असे सांगत भयाचा धाक घालून रक्कम वसूल केली जाते. तुमच्या नातेवाईकांकडून परदेशातून पार्सल आले आहे. सोडवण्यासाठी विशिष्ट रक्कम भरा, असे सांगून रक्कमेची मागणी
केली जाते. काहीवेळा तुमचे सीमकार्ड पुढील 24 तासात ब्लॉक केले जाईल आणि प्रक्रिया करण्यासाठी 1 रुपया पाठवा, असे सांगत एक रुपयाच्यासोबत येणारा तपशील घेऊन खाते साफ
करण्यात येते. कोणत्या ना कोणत्या रुपाने तुम्हाला आलेला पिन किंवा खात्याचा तपशील मिळवून खात्यातील रक्कम लुबाडण्याचा उद्योग सायबर गुन्हेगार करत असतात. त्यासाठी प्राथमिक माहिती सामान्य लोकांकडून मिळवली जाते. ती
देण्यासाठी लोकांना उद्युक्त केले जाते.
रत्नागिरी जिह्यात डिसेंबर अखेर संपलेल्या वर्षात 4 कोटी 5 लाख 86 हजार 23 रुपये एवढ्या रकमेची सायबर फसवणूक झाल्याचे वेगवेगळे 86 गुन्हे नोंदवले गेले. संशयित व्यवहारात
अडकलेली रक्कम गोठवून ठेवावी, अशी विनंती तपास यंत्रणा किंवा न्यायालयाने केल्यास ती रक्कम गोठवली जाते. अशी गोठवलेली रक्कम 41 लाख 77 हजार 362 रुपये असल्याचे जिल्हास्तरावरील नोंदींवरून स्पष्ट होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक फसवले जात असल्याचे एका बाजूला नोंदवले जात आहे.
मात्र दुसऱ्या बाजूला या गुन्ह्यात अडकलेली रक्कम परत मिळण्याचे प्रमाण शून्य रुपये एवढे आहे. सध्या देशात असलेले कायदे, फसवणूक करणाऱयांसाठी असणारी मोकळीक, फौजदारी न्याययंत्रणा यामधून फसवणूक
झालेल्या लोकांना दिलासादायक काहीच होत नसल्याचे चित्र यानिमित्ताने उभे राहिले आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यापैकी कित्येक गुन्हे अफायनल म्हणजे पुरावा सापडून येत नाही, असा
अहवाल न्यायालयाला पाठवण्यात आला आहे. एक गुन्हा 1 एप्रिल 2024 रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे या गुह्यामध्ये पोलीस कर्मचारी फिर्यादी आहे. पोलिसांनी इन्स्टाग्रामला युजर आयडीची
माहिती आणि इतर माहिती, एसडीआर, सीडीआर
मिळण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. टीपलाईन रिपोर्टमधील प्राफ्त आयपीची माहिती मिळवण्यासाठी जेपीआर डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड यांना पत्रव्यवहार केला आहे. अद्याप
पोलिसांना तपासकामी हवे असलेली माहिती या गुन्ह्यात प्राप्त झालेली नाही. तब्बल 9 महिने उलटून गेले तरी माहिती देण्याचे सौजन्य संबंधित यंत्रणांनी दाखवले नाही. तपासकामी अनेक मर्यादा आहेत, असे यंत्रणेतील वरिष्ठांचे म्हणणे आहे.
चिपळूण पोलीस स्थानकात 1 जुलै रोजी एका 16 वर्षीय मुलीने फिर्याद नोंदवली. बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधकायद्याप्रमाणे नोंद करण्यात आली. अज्ञातस्थळावरून कुणा एकाने धमकी दिल्याचेही नमूद करण्यात आले होते. या
प्रकरणामध्ये इन्स्टाग्रामला पत्रव्यवहार केला. इमेल प्राप्त झाला. त्याची माहिती मिळण्यासाठी गुगल सर्चला पत्रव्यवहार केला. ती माहिती प्राप्त होण्यावर, हा तपास प्रलंबित आहे. गुगलसारख्या आंतरराष्ट्रीय मान्यताप्राफ्त संस्थेकडून
महिनोन्महिने पोलिसांना प्रतिसाद मिळत नाही. ही बाब गांभिर्याने पुढे आली आहे. बालकांच्या लैंगिक अत्याचारास प्रतिबंध करणारे कठोर कायदे लागू झाले तरी सायबर क्षेत्राचा वापर त्यासाठी करणाऱ्या अनुचित लोकांविरूद्ध कठोर पावले
टाकणे तपास यंत्रणांना विलंबामुळे अवघड होत आहे. एप्रिलमध्ये चाईल्ड पोर्नोग्राफीचा व्हिडिओ शेअर झाल्याचा गुन्हा चिपळूण पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला. परंतु या प्रकरणात अद्याप आरोपपत्र न्यायालयात सादर होऊ शकले नाही.
धक्कादायक वास्तव आकडेवारीतून पुढे
सायबर गुन्ह्यांची विविध स्तरावरील अडीअडचणींचा पाढा तपास यंत्रणा सांगत असते. गेले वर्षभरात रत्नागिरी जिह्यातील लोकांचे 4 कोटी रुपये लुटून नेण्यात आले आणि गुन्हेगारांकडून ती रक्कम अजिबात वसूल होऊ शकली नाही, हे धक्कादायक
वास्तव आकडेवारीतून पुढे आले आहे.