Wednesday, October 28, 2026
spot_img
Home दापोली लोखंडी अँगलला धडकून दुचाकीचा भीषण अपघात

लोखंडी अँगलला धडकून दुचाकीचा भीषण अपघात

दोन तरुण गंभीर; दापोली गिम्हवणे येथील घटना

दापोली:- दापोली-हर्णे मार्गावरील गिम्हवणे येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव दुचाकीचा भीषण अपघात झाला असून यामध्ये दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. गिम्हवणे येथील इंडियन ऑइल नवीन पेट्रोल पंपासमोरील मंदिरालगत हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, दुर्वांग राजेंद्र यादव (वय १७, रा. गिम्हवणे-दापोली) आणि संकेत अमर देवळेकर (वय २४, रा. खेड) हे दोघे मित्र एमएच ०८ जे २९५२ क्रमांकाच्या हिरो स्प्लेंडर मोटरसायकलवरून जेवणासाठी दुर्वांगच्या घराकडे जात होते. मध्यरात्री रस्त्यावर वर्दळ नसताना आणि घर अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर उरले असतानाच दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेली दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी अँगल व बॅनरला अत्यंत वेगाने जाऊन आदळली.

ही धडक इतकी जोरदार होती की दोघेही तरुण रस्त्याच्या बाजूला फेकले गेले आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने दोन्ही जखमींना आपल्या वाहनातून दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर दोघांनाही चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात पुढील उपचारांसाठी हलवण्यात आले. मात्र, दुचाकी चालवणाऱ्या दुर्वांग यादव याच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाल्याने प्रकृती चिंताजनक बनल्यामुळे त्याला अधिक उपचारांसाठी सोमवारी दुपारी थेट मुंबईला हलवण्यात आले आहे. दुसरीकडे संकेत देवळेकर याच्या डोक्याला व पायाला जबर मार लागला असून त्याच्यावर डेरवण येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून हेड कॉन्स्टेबल बुरोंडकर पुढील तपास करत आहेत. दुचाकीचालक अल्पवयीन असल्याने पोलीस आता नेमकी काय कायदेशीर कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.