तीन दिवसांपासून होती बेपता
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील पिंपळी सोनारवाडी येथील २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह गोवळकोट येथील वाशिष्ठी नदीच्या विसर्जन घाटावर आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंकीता रविंद्र गोरीवले असे या मयत तरुणीचे नाव असून, ती गेल्या तीन दिवसांपासून घरातून बेपत्ता होती. या घटनेमुळे पिंपळी आणि गोवळकोट परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळी सोनारवाडी येथे राहणारी अंकीता गोरीवले ही तरुणी २५ ऑगस्ट रोजी अचानक बेपत्ता झाली होती. याप्रकरणी तिच्या नातेवाईकांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार चिपळूण पोलिसांत नापत्ता नोंद क्रमांक ४९/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करून तिचा शोध सुरू करण्यात आला होता. पोलीस आणि नातेवाईक गेल्या तीन दिवसांपासून तिचा सर्वत्र शोध घेत होते.
दरम्यान, २८ ऑगस्ट रोजी सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास गोवळकोट गावच्या शिंदेवाडी येथील वाशिष्ठी नदीच्या पात्रात असलेल्या गणपती विसर्जन घाटाजवळ स्थानिकांना एक मृतदेह तरंगताना दिसून आला. या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. चिपळूण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह नदीच्या पात्राबाहेर काढला. ओळख पटवली असता, हा मृतदेह बेपत्ता असलेल्या अंकीता गोरीवले हिचाच असल्याचे निष्पन्न झाले.
घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अंतर्गत आकस्मिक मृत्यूची (री आमृ. क्रमांक ५५/२०२६) नोंद करण्यात आली आहे.
तरुणीचा मृत्यू नक्की पाण्यात बुडून झाला की त्यामागे अन्य काही कारण आहे, याचा सखोल तपास चिपळूण पोलीस करत आहेत. कामथे उपजिल्हा रुग्णालयाचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.









