Friday, July 17, 2026
spot_img
Home लांजा लांजा बेनी खुर्द येथे प्रौढाची आत्महत्या

लांजा बेनी खुर्द येथे प्रौढाची आत्महत्या

राहत्या घरी गळफास घेऊन केली जीवनयात्रा संपवली

लांजा:- लांजा तालुक्यातील बेनी खुर्द बौद्धवाडी येथे एका ४२ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी, १४ जुलै रोजी उघडकीस आली. संतोष विजय धनावडे (वय ४२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष धनावडे हे १४ जुलै रोजी आपल्या बेनी खुर्द येथील राहत्या घरी होते. सायंकाळी ७.४० वाजण्याच्या सुमारास त्यांनी घरातील लोखंडी बारला कापडी ओढणीच्या (स्कार्प) सहाय्याने गळफास लावून घेतल्याचे आढळून आले. ही बाब निदर्शनास येताच नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले.
​स्थानिक लोक आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना त्वरित खाली उतरवून उपचारासाठी लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना ‘दाखल करण्यापूर्वीच मयत’ घोषित केले. वैद्यकीय अहवालानुसार, मृत्यूचे कारण ‘गळफासामुळे गुदमरणे’ असे नमूद करण्यात आले आहे.
​पोलीस तपास सुरू
या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (अ.मृ. क्र. ३७/२०२६) करण्यात आली असून, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता १९४ नुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. संतोष धनावडे यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.