Monday, May 18, 2026
spot_img
Home चिपळूण रेल्वेतून तोल जाऊन पडल्याने तरूणाचा मृत्यू

रेल्वेतून तोल जाऊन पडल्याने तरूणाचा मृत्यू

चिपळूण:- आपल्या बहिणीसोबत गावी जात असताना रेल्वेमधून अचानक तोल जाऊन खाली पडल्याने एका १९ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवार, १६ मे रोजी दुपारी १२:४० वाजण्याच्या सुमारास चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते बौद्धवाडी येथील रेल्वे पोल क्र. १३०/२० जवळ घडली.
ओंकार विजय गुरव (वय १९ वर्षे, रा. कुर्ला कमानी, मुंबई; मूळ रा. कडवई, ता. संगमेश्वर) असे मृत तरूणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार गुरव हा मुंबईहून आपल्या बहिणीसोबत कोकणात राहत्या गावी येत होता. रेल्वे प्रवासादरम्यान दुपारी पाऊणच्या सुमारास कळंबस्ते परिसरात आला असता, रेल्वेच्या दरवाज्याजवळून त्याचा अचानक तोल गेला. तोल सुटल्याने तो थेट धावत्या रेल्वेतून खाली कोसळला. रेल्वे पोलजवळ पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
ऐन उन्हाळी सुट्टीत बहिणीसोबत गावी येत असताना काळाने ओंकारवर घाला घातल्यामुळे गुरव आणि मूळ गाव असलेल्या कडवई परिसरावर तीव्र शोककळा पसरली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. (भारतीय नागरिक सुरक्षा संहिता) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.