रिक्षा व्यवसायावरून वाद; पती-पत्नीला बांबूने मारहाण

राजापूर गुरववाडीतील घटना

राजापूर:- राजापूर तालुक्यातील विलये, गुरववाडी येथे रिक्षा व्यवसायातील वादातून एका दाम्पत्याला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन भावांविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ मार्च रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी गणपत दत्ताराम मांडवकर (वय ३३) हे आपल्या पत्नीशी रिक्षा व्यवसायाबाबत चर्चा करत होते. यावेळी घरासमोर राहणारे संशयित आरोपी संदीप दौलत गुरव आणि प्रफुल्ल दौलत गुरव तिथे आले. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. संदीप गुरव याने हातात लाकडी बांबू घेऊन फिर्यादी गणपत मांडवकर आणि त्यांच्या पत्नीवर हल्ला केला.

गणपत मांडवकर यांच्या पाठीच्या डाव्या बाजूला आणि उजव्या हाताच्या मनगटावर बांबूने प्रहार करण्यात आला. पतीला वाचवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या पत्नी वैदेही यांच्या उजव्या हातावरही बांबूने मारहाण करण्यात आली. प्रफुल्ल गुरव याने गणपत मांडवकर यांची मान पाठीमागून पकडून त्यांना हाताच्या थापटाने पाठीवर मारहाण केली.
मारहाण सुरू असतानाच संदीप गुरव याने फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करत ‘ठार मारण्याची’ धमकीही दिली.

​या घटनेनंतर गणपत मांडवकर यांनी राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी २५ मार्च रोजी पहाटे ४:२० वाजता भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(१), १३१ आणि ३(५) अन्वये गुन्हा (गु.र.नं. ७२/२०२६) दाखल केला आहे.