राजिवडा येथे अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करून व्हिडिओ व्हायरल

दोघांना अटक; पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील राजिवडा परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन बालकावर लैंगिक अत्याचार करून त्या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी दोघा तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना कोठडीत धाडले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घडली होती. राजिवडा येथील जुबेर सलीम शेख (वय २२) आणि मुस्तकीन गडकरी (वय २४) या दोघांनी एका अल्पवयीन बालकावर लैंगिक अत्याचार केले. पीडित बालक घाबरलेल्या अवस्थेत असल्याने त्याने सुरुवातीला या प्रकाराची कल्पना आपल्या पालकांना दिली नव्हती. मात्र, नराधम आरोपींनी या कृत्याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता.

गुरुवार, १२ मार्च रोजी पीडित मुलाच्या वडिलांच्या निदर्शनास सोशल मीडियावर एक व्हिडिओ आला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला, कारण व्हिडिओतील बालक त्यांचा स्वतःचा मुलगा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी क्षणभरही विलंब न लावता थेट रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद नोंदवली.

पालकांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी जुबेर शेख आणि मुस्तकीन गडकरी यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांसह अत्यंत कडक अशा बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कायद्यातील तरतुदींनुसार, अल्पवयीन मुलांवरील अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये कडक शिक्षेची तरतूद आहे. तसेच, व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

​घटनेचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेता, या प्रकरणाचा तपास स्वतः पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी आपल्या हाती घेतला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, त्यांनी हा व्हिडिओ आणखी कुठे प्रसारित केला आहे का, याचा तांत्रिक तपास पोलीस करत आहेत.