Friday, May 1, 2026
spot_img
Home गुन्हेगारी तहसीलदारांच्या आदेशाचे उल्लंघन; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

तहसीलदारांच्या आदेशाचे उल्लंघन; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

राजापूर हातदे येथील घटना

राजापूर:- शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्यासाठी तहसीलदार कार्यालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी राजापूर तालुक्यातील हातदे येथील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

​राजापूर तालुक्यातील हातदे गावामध्ये शिमगोत्सवाच्या आयोजनावरून दोन गटांत वाद होता. हा वाद मिटवण्यासाठी आणि सण शांततेत पार पाडण्यासाठी माननीय तहसीलदार, राजापूर यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये एक विशेष आदेश २८ फेब्रुवारी रोजी निर्गमित केला होता.

या आदेशानुसार, दोन्ही गटांनी एकत्रितपणे शिमगोत्सव साजरा करावा आणि ग्रामदेवतेची पालखी ‘पार्टी नंबर ०२’ च्या घरी नेण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, २ मार्च २०२६ पासून ‘पार्टी नंबर ०१’ मधील काही सदस्यांनी या सरकारी आदेशाचे पालन करण्यास नकार दिला.

​तहसीलदारांच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी सुशील हरिश्चंद्र चव्हाण, मनोहर अनंत चव्हाण, शांताराम पर्शुराम चव्हाण, दिनानाथ तुकाराम चव्हाण, विजय दत्ताराम चव्हाण (सर्व राहणार हातदे, ता. राजापूर)या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

​या प्रकरणी पाचल येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) मारुती संजय कोदले (वय ३०) यांनी राजापूर पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २२३ आणि ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक ५९/२०२६ नोंदवला आहे. सरकारी आदेशाचे उल्लंघन करून सामाजिक शांतता धोक्यात आणल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.