Tuesday, June 16, 2026
spot_img
Home गुन्हेगारी राजापूर पंचायत समितीतील अपहार प्रकरणी दोघे निर्दोष

राजापूर पंचायत समितीतील अपहार प्रकरणी दोघे निर्दोष

रत्नागिरी:- राजापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील दहा लाखाच्या धनादेशाची चोरी आणि अपहार प्रकरणी दोन्ही आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. राजापूर तालुका पंचायत समिती कार्यालयातील शिक्षण २०१३ मध्ये दहा लाखाच्या धनादेशाची चोरी आणि अपहार झाला होता. राजापूर न्यायालयाचे न्यायाधीश सूरज नलवडे यांनी सबळ पुराव्याअभावी त्यातील दोघांची निर्दोष मुक्त्तता केली. तशी माहिती आरोपींचे वकिल ॲड. समीर कुंटे यांनी दिली.

अपहाराबाबतची तक्रार तत्कालीन गटशिक्षणाधिकारी तानाजी नाईक यांनी राजापूर पोलिसांत दिली होती. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी वाघू शंकर कोडलकर, संजय दत्ताराम नेवरेकर व या खटल्यातील फिर्यादी असलेले तत्कालीन गटशिक्षणाधिकारी तानाजी भिकू नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी तपास करून तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक विलास सुतार यांनी राजापूर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी राजापूर न्यायालयात खटला सुरू होता. यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने असंख्य साक्षीदार तपासण्यात आले. दरम्यान यातील संशयित आरोपी संजय नेवरेकर याचा न्यायालयात खटला सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे उर्वरित दोन संशयित आरोपींविरोधात न्यायालयात खटला सुरू होता. यावर झालेल्या सुनावणीअंती आज राजापूर न्यायालयाने निकाल दिला.

या प्रकरणी संशयित आरोपी वाघू कोडलकर यांच्या वतीने ॲड. प्रवीण सुर्वे, ॲड. समीर कुंटे, तर तानाजी भिकू नाईक यांच्या वतीने ॲड. यशवंत कावतकर, ॲड. विकास पळसकर, ॲड. निखिल तेरवणकर यांनी काम पाहिले.