राजापूर:- राजापूर तालुक्यातील ओशिवळे, गुरववाडी येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटाची तिजोरी उचकटून रोख रकमेसह इलेक्ट्रिक वस्तूंची चोरी केली असून, याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओशिवळे (गुरववाडी) येथील रहिवासी आणि चालक व्यवसायानिमित्त बाहेर असणारे फिर्यादी अनिल दत्ताराम गुरव (५१) यांचे चुलते झिमाजी रामचंद्र गुरव यांचे घर बंद होते. दि. २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेपासून ते २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १a
वाजण्याच्या सुमारास, अज्ञात चोरट्याने या बंद घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा कोणत्यातरी हत्याराने उचकटून आत प्रवेश केला.
चोरट्यांनी घरातील खोलीत असलेल्या लोखंडी कपाटाचे दरवाजे आणि तिजोरी जबरदस्तीने उचकटली. यामध्ये घरगुती वापरातील इलेक्ट्रिक साहित्य व रोख रक्कम चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे:
याप्रकरणी अनिल गुरव यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजापूर पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (क), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास राजापूर पोलीस करत असून, ग्रामीण भागात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.









